Tuesday, April 5, 2011

२ एप्रिल २०११

आज जणू सोनियाचा दिवस - ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आदि तुल्यबळ नि परंपरागत प्रतिस्पर्ध्याना नमवून भारताने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. आणि आज लंकादहनाची वेळ होती! मायक्रोसॉफ्टच्या कॅफे मध्ये मोठ्या स्क्रीन वर ह्या स्पर्धेतल्या भारताच्या सगळ्या मॅचेस दाखवतात.. गेल्या वेळच्या पाकिस्तानच्या सामन्याचा अनुभव लक्षात घेता आज खूप जास्त गर्दी अपेक्षित होती. शिवाय गेल्या सामन्यात लोकांनी खूपच राडे केल्यामुळे ह्यावेळी security वाल्यांनी लोकांची संख्या १००० च्या आत असेल ह्या अटीवरच प्रक्षेपणास परवानगी दिली होती. त्यामुळे जो येईल त्याला आत घुसू न देता, registration करावं लागणार होतं. दुपारी ३ वाजता RSVP ची लिंक उघडणार होती register करण्यासाठी. त्यामुळे तिकडेच डोळे लावून बसले होते सगळे. लिंक चालू होताच अवघ्या ४ मिनिटात सर्वच्या सर्व जागा भरल्या!


इकडच्या रात्री २ ला मॅच सुरू होणार होती. पण १२-१२.३० पासूनच कमरेवर ढोल-ताशे, एका हातात तिरंगा, दुसर्‍या हातात "रसम की कसम, लंका फोड देंगे हम", "रामायण-II", "Bleed Blue" असं काही-बाही लिहिलेले फलक, तीन रंगात माखलेले तोंड अशा अवस्थेतल्या निळ्या कोल्हयांच्या झुंडी कॅफेबाहेर जमू लागल्या होत्या. वानखेडेच्या नॉर्थ स्टँडची आठवण होत होती. कॅफे मध्ये ३ मोठे स्क्रीन असतात. आज लवकर आलो तरी नेहमीच्या स्क्रीनसमोरची जागा मिळू शकली नाही. यापूर्वीच्या सर्व मॅचेस त्याच स्क्रीनसमोर एका ठराविक जागी बसूनच पहिल्या होत्या! तसा माझा अंधश्रद्धेवर वगैरे विश्वास नाहीये.. पण का कोण जाणे - "नशीब" आज आपल्या बाजूने आहे की नाही अशी धाकधूक होत होती. सुरुवातही चमत्कारिक झाली - टॉस झाला - पण तो दोनदा! दूसरा धक्का म्हणजे - अश्विन ऐवजी श्रीशांत! हे कळल्यानंतर कॅफे मध्ये एकच कोलाहल माजला! शेवटी एकदाची सुरू झाली मॅच. झहीर नि युवराज च्या बोलिंगमुळे आणि रैना, कोहलीच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे श्रीलंकेची सुरुवात धीमी झाली. पण अखेरच्या षटकात जयवर्धनेने हाणामारी करून २७५ धावांचे आव्हान उभारले!

सचिन-सेहवाग मैदानात उतरताच लोकांनी कॅफे डोक्यावर घेतला.. पण तो आवाज जेमतेम २ चेंडू टिकला. सेहवाग नि सचिनला मलिंगाने पहिल्या २-३ षटकात उडवल्याने कॅफे मध्ये स्मशानशांतता पसरली! आता काही खरं नाही! मी पण जरा पाय मोकळे करण्यासाठी उठलो.. फिरत फिरत माझ्या नेहमीच्या स्क्रीनसमोर जातो तोच कोहलीने चौकार मारला. म्हटलं ही चांगली खूण आहे! सचिन बाद झाल्याने काही लोक निघून गेले होते. ते पाहून मी ह्या स्क्रीन समोरची माझी नेहमीची जागा परत पटकावली - आणि मग "नशीब" परत आपल्या बाजुने! मग काय गंभीर, कोहली, धोनी नि युवराज नि निवांत खेळत विजय दृष्टिपथात आणला! धोनीने जोशात षटकार मारत रजनी स्टाइलने बॅट हातात घुमावली, नि एकच जल्लोष झाला! धोनीच्या नेतृत्वाखाली, सचिनसाठी विश्वचषक जिंकण्याच्या इर्षेला पेटलेल्या भारतीय संघाने २८ वर्ष अधुरे राहिलेले स्वप्न अखेर पूर्ण केले होते! सचिन-सचिन, धोनी-धोनी, इंडिया-इंडिया ह्या आरोळ्यांनी कॅफेच नवे तर अक्षरश: आसमंत दुमदुमून गेला! भारतात ह्यावेळी काय असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी! त्यावेळच्या भावना खरच शब्दातीत आहेत. म्हणून सरळ हा विडिओच बघा!

मॅचनंतर धिंगाणा घालून झाल्यावर मग मयूरी चाट मध्ये जाऊन celebrate केलं. मॅचनंतर लगेच ब्रह्म - माझा 2-2.5 वर्ष असलेला roommate - गूगल join करण्यासाठी कॅलिफोर्नियाला निघणार होता. त्यामुळे तेही थोडे centi वातावरण होते! त्याला निरोप देऊन दुपारी जी ताणून दिली ते थेट रात्री ११ लाच उठलो!

(ता.क. : शक्यतो मी महिनाभरच्या घटनांची एक ब्लॉग एंट्री करण्याचा विचार करतोय.. पण आजचा दिवसच एवढा खास होता की it deserves a separate mention!
ता.क. : पाकिस्तानच्या मॅचचा विडियो सुद्धा इकडे अपलोड केलेला आहे.)

पुन्हा अघळ पघळ..

आज इतर ब्लॉग वाचत असताना अचानक मला माझ्याच प्रोफाइल मधला हा जुना ब्लॉग दिसला. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2009 ची अघळ पघळ दैनंदिनी - अघळ पघळ अशासाठी की हा काही साहित्यिक अथवा उपमा-अलंकारांनी सुशोभित केलेला ब्लॉग नाही - ही आहे एक साधी सुधी दैनंदिनी. फक्त इतिहासात घेऊन जाण्यासाठी.. मला आठवतंय 2008-2009 मध्ये जेव्हा मे अमेरिकेत नवीन होतो तेव्हा एकडच्या बर्‍याच गोष्टींचे खूप कुतूहल वाटायचं. म्हणून म्हटलं लिहुया काय कसं वाटतंय ते - भविष्यात वाचून छान वाटेल.. आणि आज अगदी तसाच झालं! एकदम 2 वर्ष मागे जायला झालं. पुन्हा अधिक तरुण होण्याचा हा बहुदा एकच मार्ग असावा!

गेल्या 2 वर्षात खूप काही बरं-वाईट घडलं.. बरीच जवळची माणसं कायमची सोडून गेली.. काहींशी वाद झाले.. पण त्याचबरोबर दोनचे चार हातही झाले - माझी आद्य मैत्रीण कायमची माझी झाली, कामातही प्रगती झाली.. आणि इतरही बरच काही! पण ह्या सगळ्याची फक्त गोळाबेरीजच आता शिल्लक आहे.. त्या क्षणीच्या भावना नाही पुन्हा निर्माण करता येत.. पण 2009 मार्च च्या भावना मात्र आज पुन्हा जागृत झाल्या - केवळ या दैनंदिनी मुळे.. म्हणून आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा एकदा ही दैनंदिनी लिहावी असा विचार करतोय - निश्चय नाही म्हणत मी - कारण तो झाला होता 2009 मधेच करून, आणि त्याचा 3 महिन्यातच बोर्‍याही वाजला होता.. म्हणून ह्यावेळी फक्त विचार!

असो - तर मग परत सुरू करतोय लिखाण.. बघू जोपर्यंत जमेल तोपर्यंत!